भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३४ वी जयंती. पण गेल्या काही वर्षातील जयंती महोत्सवावर नजर टाकली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त पुतळ्यांना हार घालण्यासाठी, ओरडून भाषणं ठोकण्यासाठी, डीजेच्या तालावर नाचण्यासाठी आणि सोशल मीडियावर स्टेटस टाकण्यापुरती मर्यादित झाली आहे का ? यावर चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता हा दिवस खोल आत्मपरीक्षण करण्याचा आहे की, आपण बाबासाहेबांचा विचार किती जपलाय, किती विसरलाय आणि कुठे हरवून गेलाय याचा? बाबासाहेबांनी आपल्याला समता, बंधुता आणि स्वातंत्र्याची स्वप्नं दिली. पण आज आपण ती स्वप्नं जाती-धर्माच्या दलदलीत गुदमरायला सोडली आहेत.
बाबासाहेब फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते एक स्वतः क्रांतिकारी चळवळ होते, एक तत्त्वज्ञान होते. ज्याने प्रत्येक माणसाच्या मनात अन्यायाच्या भिंती तोडण्याची ताकद निर्माण केली. त्यांचा विद्रोह केवळ अस्पृश्यतेविरुद्ध नव्हता. तो होता जातीच्या गुलामगिरीविरुद्ध, धर्माच्या अंधश्रद्धांविरुद्ध, आर्थिक शोषणाविरुद्ध आणि लैंगिक भेदभावाविरुद्ध. त्यांनी दलित समाजाला शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा मार्ग दाखवला. त्यांनी म्हटलं होतं, "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!" हे फक्त शब्द नव्हते, तर एक क्रांतिकारी मंत्र होता. पण आज आपण या मंत्राचा अर्थ विसरलो आहोत. आपण शिकतो आहोत खरं, पण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, नोकरीसाठी, पैशासाठी. आपण संघटित होतो आहोत, पण जातीच्या, धर्माच्या नावावर एकमेकांना तोडण्यासाठी, नव्हे तर जोडण्यासाठी. आणि संघर्ष? तो आता सोशल मीडियावर लाइक्स आणि शेअर्स मिळवण्यापुरता उरलाय. बाबासाहेबांचा विचार आज हरवला आहे.
बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं. एक असा दस्तऐवज, ज्याने प्रत्येक माणसाला समान हक्क मिळाले, समान सन्मान मिळाला. पण आज त्या संविधानाचं काय झालंय? ते फक्त कागदावरचं एक पुस्तक बनलंय का? त्यातील समतेची तत्त्वं आपण प्रत्यक्षात किती जपतो? बाबासाहेबांनी जातीच्या भिंती तोडण्याचं स्वप्न पाहिलं, पण त्या भिंती अजूनही उभ्या आहेत. फक्त त्यांचं स्वरूप बदललंय. जातीच्या नावावर शिक्षणापासून नाकारलं जातं, मंदिरात प्रवेशासाठी अपमान सहन करावा लागतो. आणि शहरात? "आमच्या सोसायटीत त्या जातीचे लोक नको" असं सांगितलं जातं, भाड्याने घर देताना जातीचं नाव विचारलं जातं. आज धर्म फक्त द्वेष पेरण्याचं हत्यार बनलाय. मंदिर-मशिदीच्या वादातून हिंसा पेटते, आणि समाजाच्या तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागणी होते.
बाबासाहेबांनी समाजाला एक स्पष्ट आवाहन केलं होतं की, राजकीय सत्ता मिळवून समाजाचा विकास करा. त्यांनी म्हटलं होतं, "शासनकर्ती जमात व्हा" कारण राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची चावी आहे, दलित समाजानी एकत्र येऊन ती सत्ता मिळवावी, आणि ती समाजाच्या विकासासाठी वापरावी. पण आज आपण त्या सत्तेचा उपयोग कसा करतोय? आपण राजकारणात भाग घेतो, पण ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा जाती-धर्माच्या नावावर. आज आंबेडकरी पक्ष घराघरात तयार झालेले आहे, पण समाजाला पुढे घेऊन जाईल असे सक्षम नेतृत्व एकही नाही ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळेच बाबासाहेबांच्या स्वप्नातील शासनकर्ती जमात अजूनही आपण होऊ शकलो नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
आजचं राजकारण बाबासाहेबांच्या विचारांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. प्रत्येक पक्ष त्यांचं नाव घेतो, पण त्यांचे विचार कोण अमलात आणतं? निवडणुकीच्या वेळी बाबासाहेबांचा फोटो लावला जातो, मोठमोठ्या जयंत्या साजऱ्या होतात, पण सत्तेत आल्यावर त्याच समाजाला विसरलं जातं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाला भडकवलं जातं, पण खऱ्या अर्थाने सामाजिक समता कोण आणतं? आपण बाबासाहेबांचं नाव वापरणाऱ्या नेत्यांना प्रश्न विचारायला हवेत. त्यांनी खरंच सामाजिक न्यायासाठी काय केलं? निवडणुकीच्या वेळी बाबासाहेबांचा फोटो लावणारे, जयंतीला मोठमोठ्या सभा घेणारे नेते प्रत्यक्षात किती प्रामाणिक आहेत? त्यांच्या कृतीत बाबासाहेबांचा विचार दिसतो का? आपण मते देण्याआधी त्यांचं खरं रूप ओळखायला हवं.
बाबासाहेबांनी आपल्याला विचारशक्ती दिली, ती वापरायला हवी. आपण फक्त त्यांचे अनुयायी नाही, तर त्यांच्या विचारांचे खरे वारस व्हायला हवं. बाबासाहेबांनी शिक्षणाला स्वातंत्र्याचं साधन मानलं. त्यांनी स्वतः शिक्षणासाठी आयुष्य वेचलं, लंडन-न्यूयॉर्कपर्यंत जाऊन ज्ञान मिळवलं, आणि ते समाजाला परत दिलं. पण आज शिक्षणाचं काय झालंय? खाजगी शाळा-कॉलेजांनी शिक्षणाला बाजार बनवलंय. गरीब मुलांना शिक्षण मिळणं कठीण झालंय. आणि ज्यांना मिळतं, त्यांना बाबासाहेबांचे विचार शिकवले जात नाहीत. शाळेत त्यांचं नाव फक्त एका परिच्छेदात येतं आणि मग विसरलं जातं.
आणखी एक कटू सत्य आहे, ती म्हणजे आपली ढोंगी मानसिकता. आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, पण त्यांच्या विचारांवर चालत नाही. जयंतीला मोठमोठ्या सभा घेतो, कार्यक्रम घेतो पण तिथे जातीच्या नावावर राजकारण खेळलं जातं. आपण त्यांच्या विचारांचा गौरव करतो, पण प्रत्यक्षात जाती-धर्माच्या भेदांना खतपाणी घालतो. हा ढोंगीपणा बाबासाहेबांच्या विचारांना मारण्यासारखा आहे. आपण त्यांच्या पुतळ्यांना हार घालतो, पण त्यांचा विचार मनापासून अंमलात आणतो का ? आपण त्यांच्या नावाने शपथ घेतो, पण त्यांनी दाखवलेल्या समतेच्या मार्गावरून पाठ फिरवतो. ही दुटप्पी वृत्ती बाबासाहेबांच्या स्वप्नांची थट्टा आहे.
बाबासाहेबांचा विचार पुन्हा जागवायचा असेल, तर आपल्याला प्रामाणिकपणे बदल घडवावे लागतील. जातीच्या नावावर गर्व करणं थांबवावं लागेल. प्रत्येक माणूस समान आहे, हा बाबासाहेबांचा मंत्र आपल्या कृतीत उतरावा लागेल. आपण आपल्या मुलांना बाबासाहेबांचं साहित्य, त्यांचं तत्त्वज्ञान शिकवायला हवं. शिक्षण फक्त नोकरी मिळवण्याचं साधन नाही, तर समाज बदलण्याचं शस्त्र आहे. प्रत्येक शाळेत, प्रत्येक कॉलेजात बाबासाहेबांचे विचार अभ्यासक्रमाचा हिस्सा व्हायला हवेत. त्यांनी लिहिलेली पुस्तकं, मग ते "जातिव्यवस्थेचे निर्मूलन" असो की "बुद्ध आणि त्यांचा धम्म" प्रत्येक तरुणाने वाचायला हवीत. फक्त जयंतीच्या दिवशी त्यांचं नाव घेऊन आपली जबाबदारी संपत नाही. त्यांचा विचार रोजच्या जीवनात उतरायला हवा.
बाबासाहेब आज जिवंत असते, तर त्यांनी आपल्या सगळ्यांना एकच प्रश्न विचारला असता: "मी तुम्हाला स्वप्नं दिली, पण तुम्ही ती का चिरडली?" त्यांनी आपल्याला समता शिकवली, पण आपण ती जाती-धर्माच्या खेळात गमावली. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, पण आपण ते स्वार्थाच्या आणि अज्ञानाच्या बेड्यांमध्ये अडकवलं. पण अजूनही सगळं संपलेलं नाही. बाबासाहेबांचा विचार अजूनही आपल्यात आहे. प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या माणसात, प्रत्येक समतेचं स्वप्न पाहणाऱ्या मनात. आज त्यांची जयंती आहे. पण फक्त पुतळ्यांना हार घालू नका. त्यांचा विचार जागवा. त्यांचा सामाजिक विद्रोह जिवंत करा. बाबासाहेबांचं स्वप्न फक्त त्यांचं नव्हतं ते आपलं आहे. आणि ते साकार करणं ही आपली जबाबदारी आहे.
जयभीम!
सुरज पी दहागावकर
चंद्रपूर
0 Comments